महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी - प्रार्थना समाज , आर्य समाज आणि सत्यशोधक समाज
महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी
प्रार्थना समाज , आर्य समाज आणि सत्यशोधक समाज याच्या विषयी माहिती
व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी या देशात आपली सत्ता प्रस्थापित केली. पुढे ते राज्यकर्ते बनले. त्यांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रात नव्या युगास प्रारंभ झाला. इंग्रजांबरोबर ख्रिश्चन मिशनरीही महाराष्ट्रात दाखल झाले. ख्रिश्चन मिशनरी म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचे कार्य करणारे लोक. ख्रिश्चन धर्मप्रसार करणाऱ्या संस्थांना 'मिशन' आणि धर्मप्रसाराचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना 'मिशनरी' म्हटले जाते. या मिशनऱ्यांनी देशभर सेवाभावी मार्गाचा अवलंब करून मोठ्या चिकाटीने ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार केला. याचबरोबर त्यांनी सामाजिक सुधारणा करण्याचाही प्रयत्न केला. जातिनिर्मूलन, शिक्षण, स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न, आरोग्यविषयक जागृती, आदिवासी व गरीब लोकांच्यासाठी केलेले कार्य अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहे. थोडक्यात, मिशनऱ्यांनी गरिबांच्या मुलांच्यासाठी शाळा सुरू केल्या. दीनदुबळ्यांसाठी आरोग्यसेवा पुरवल्या, मोफत औषधोपचार केले, रोगपीडितांची सेवा केली. दुष्काळ, महापूर, साथीचे रोग या संकटकाळात लोकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या या सेवाभावी समाजसेवेमुळे महाराष्ट्रात समाज व धर्मसुधारणा चळवळीला चालना मिळाली.
प्रार्थना समाज
प्रार्थना समाजाची स्थापना ब्राहमो समाजाचे एक प्रभावी नेते केशवचंद्र सेन हे मुंबईत आले. त्यांनी मुंबईत धर्मसुधारणा व समाजसुधारणेच्या संदर्भात व्याख्याने देऊन लोकांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानातून समाज व धर्मसुधारकांना प्रेरणा मिळाली. दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी ३१ मार्च १८६७ रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. पुढील काळात या समाजात वा. आ. मोडक, न्या. चविरकर, न्या. म. गो. रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर इत्यादी विचारवंत सहभागी झाले. प्रार्थना समाजामार्फत 'सुबोध पत्रिका' सुरू केलेली होती. त्यातून प्रार्थना समाजाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला जात होता. मुंबईतील गिरगाव विभागात या समाजाने स्वतःची इमारत बांधली.
प्रार्थना समाजाची तत्त्वे -
- परमेश्वर एक आहे. तो सर्व विश्वाचा निर्माता आहे. तो चिरंतन, अनाकलनीय व निराकार आहे. तो सर्वशक्तिमान, दवाळू व पवित्र आहे.
- सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानि गेल्यानेच तो प्रसन्न होतो.
- परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही. मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.
- मूर्तिपूजा परमेश्वराला मान्य नाही. परमेश्वर अवतार घेत नाही. नसेच परमेश्वराने कोणतेही धर्मग्रंथ लिहिले नाहीत. सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत, म्हणून सर्वांनी
- एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने वागावे.
प्रार्थना समाजाचे कार्य प्रार्थना समाजाने हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्मसुधारणा करण्याचे कार्य हाती घेतले होते. त्यात अस्पृश्यता निवारण, विधवा पुनर्विवाह, स्वौशिक्षण, बालविवाहास विरोध, विधवांचे केशवपन इत्यादी बाबतीत भरीव कार्य केले. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना. म. जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणारी 'सोशल सर्व्हिस लोग ही संस्था स्थापन केली. नामदार गोखले यांनी देशसेवेसाठी निर्भय कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी सटस ऑफ इंडिया सोसायटी' (भारत सेवक समाज) ची स्थापना केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी "डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ही संस्था स्थापन केली. पुढील काळात या संघटनेने अस्पृश्यता निवारण्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. या वेगवेगळ्या बांतून या समाजासाठी व देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण केले. या समाजाने अनेक लोकोपयोगी कामे केली. पंढरपूर येथे 'अनाथ बालकाश्रम सुरू केले. मजुरांच्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या. "आर्य महिला समाज' ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था स्थापन केली.
असे कार्य करून सुद्धा हा समाज हिंदू धर्मीयांना आपल्या कार्यात सामावून घेऊ शकता नाही. कारण या समाजाच्या अनुयायांच्या कृतीत व वर्तनात विसंगती होती. या समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते. या समाजाचे नेते बुद्धिजीवी व विचारवंत होते. परंतु त्यांना समाजाशी जवळीक साधता आली नाही. त्यामुळे हा समाज काळाच्या ओघात लोप पावला,
आर्य समाज
आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म इ. स. २० सप्टेंबर १८२४ रोजी गुजरात मधील मोरवी संस्थानातील टंकारा येथे झाला. त्यांचे मूळ नाव 'मूळशंकर करसनदास तिवारी' असे होते.
समाजाची स्थापना इ.स. १८४५ मध्ये त्यांनी आपल्या घराचा त्याग केला. संन्यस्त होऊन गुरूप्राप्तीसाठी त्यांनी भारतभ्रमण केले. वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि प्राचीन वैदिक धर्म, संस्कृती व तत्त्वज्ञान यांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७५ मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. समाजाची स्थापना महाराष्ट्रात झाली असली, तरी उत्तर भारतात या समाजाचे कार्य फार मोठे आहे. प्रार्थना समाजातील कार्यकर्त्यांनी स्वामींना पुण्याला बोलावले. त्यांच्या प्रवचनांनी लोक प्रभावित झाले. मूर्तिपूजा करू नका. जाती भेद मानू नका. वेदाचे अध्ययन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांनी सप्रमाण पटवून दिले. मात्र पुण्यातील सनातन्यांना स्वामीचे हे विचार मान्य नव्हते. त्यांनी स्वामींना फार मोठा विरोध केला. परिणामी स्वामींनी महाराष्ट्राच्या बाहेर लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली. पुढील काळात लाहोर हेच या समाजाचे प्रमुख केंद्र बनले.
स्वामी दयानंद सरस्वती |
स्वामी दयानंद सरस्वती
आर्यत्वे
- परमेश्वर हा सच्चिदानंद स्वरूप असून तो अनादी, अनंत,निराकार, सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान व दयाळू आहे. तोच सर्व विश्वाचा निर्माता व पालनकर्ता आहे.
- परमेश्वरच सत्यज्ञानाचे मूळ आहे. आदी व अंतही परमेश्वरच आहे. सृष्टीतील सर्ववस्तू त्याच्या स्वरूपात ज्ञात आहेत.
- वेद हे ईश्वरनिर्मित आहेत, वेद हे सर्व ज्ञानाचे भांडार आहे. परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदात आहे. वेद ईश्वरप्रणीत असल्यामुळे वेदांचे अध्ययन करणे, त्यातील ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रत्येक आर्याचे परम व पवित्र कर्तव्य आहे.
- प्रत्येकाने असत्याचा त्याग व सत्याच्या स्वीकार करावा.
- प्रत्येक व्यक्तीने नीतिनियमांना अनुसरून चांगल्यावाईटाचा विचार करावा आणि सद्गुणांचे संगोपन व संवर्धन करावे.
- मानवजातीची भौतिक, आध्यात्मिक व सामाजिक उन्नती करून मानवाचे कल्याण साधावे हाच आर्य धर्माचा मूळ उद्देश आहे.
- प्रेम, न्याय व वैयक्तिक सद्गुण यांवर आधारित वर्तणूक ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
- अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रत्येकाचे ध्येय असावे.
- समाजाच्या कल्याणासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून प्रयत्न करावेत; परंतु वैयक्तिक हिताच्या बाबतीत प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास परवानगी आहे.
आर्य समाजाने आपल्या तत्त्वज्ञानाच्या आधारे सामाजिक प्रश्न व धार्मिक बाबतीत आपली मते मांडली. शुद्ध स्वरूपाचे ज्ञान बेदात असून वैदिक धर्मातील चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित नसून गुणांवर आधारित आहेत, असे प्रतिपादन केले.
आर्य समाजाचे कार्य
शुद्धीकरण चळवळ आर्य समाजाने हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना शुद्ध करून परत स्वधर्मात घेण्याचे कार्य केले. हिंदू धर्मातील कर्मठपणामुळे आजपर्यंत कोणीही हे केले नव्हते. आर्य समाजाने हिंदूंना पुन्हा स्वधर्मात येण्याचा मार्ग मोकळा केला.
शैक्षणिक व सामाजिक कार्य - आर्य समाजाने धर्मसुधारणेच्या कार्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. बहुजन समाजास कर्मठ धर्ममार्तंडांच्या मगरमिठीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. 'दयानंद अँग्लो वैदिक स्कूल'ची स्थापना करून अनेक ठिकाणी शाखा सुरू केल्या. त्यात इंग्रजीबरोबरच वैदिक धर्माचे शिक्षण दिले. शिक्षण हिंदी भाषेतून देण्यास सुरुवात केली. या समाजाचे प्रचारक स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार येथे गुरुकुल पद्धतीने धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. या समाजाने महाराष्ट्रात मुंबई, सोलापूर व कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये चालवली. तसेच स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. बालविवाह पद्धतीला विरोध केला.
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथ व विधवांच्यासाठी आश्रमांची सोय केली. अस्पृश्यता नष्ट करण्याचे प्रयत्न केले. दुष्काळ, रोगराईच्या वेळी लोकांना सहकार्य केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीस अनुकूल अशी पार्श्वभूमी तयार केली. इ.स. ३० ऑक्टोबर १८८३ रोजी स्वामींचा मृत्यू झाला.
सत्यशोधक समाज
महात्मा जोतीबा फुले यांनी १८७३ मध्ये पुणे येथे 'सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रातील अज्ञानी, अंधश्रद्धाळू, मागासलेला, दरिद्री व कष्टकरी समाज पिढ्यान्पिढ्या वरिष्ठ वर्गाच्या वर्चस्वाखाली भरडला जात होता. इंग्रजी अमलात पुरोगामी व उदारमतवादी विचार, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व लोकशाही यांचे संक्रमण येथील समाजात होऊ लागले. त्यामुळे महाराष्ट्रात धर्मसुधारणा व समाजसुधारणा चळवळींना सुरुवात झाली. या चळवळीचे स्वरूप व्यापक होऊ लागले. संघटनात्मक मागनि धर्म व समाजसुधारणांचे कार्य येथे सुरू झाले. महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणा चळवळीस व्यापक रूप देण्यासाठी शूद्र व अतिशूद्रांची सर्वांगीण स्थिती सुधारण्यासाठी, त्यांचा ग्रामीण भागात प्रचार करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली. बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे सत्यशोधक समाजाचे प्रमुख उद्दिष्ट होते. 'ब्राम्हणांचे कसब', 'गुलामगिरी', 'सार्वजनिक सत्यधर्म', 'शेतकऱ्याचा असूड' इत्यादी महात्मा फुले यांच्या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या उद्दिष्टांची चर्चा केलेली आहे. सर्व जातिधर्मातील लोकांना सत्यशोधक समाजात प्रवेश होता. या समाजाच्या मार्फत एक प्रभावी संघटना उभी करून वरिष्ठ वर्गाविरुद्ध व्यापक संघर्ष उभा करणे हाच महात्मा फुले यांचा हेतू होता.
सत्यशोधक समाजाची तत्त्वे
- ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे.
- सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत.
- परमेश्वराची भक्ती किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येक व्यक्तीस अधिकार आहे.
- आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थाची जरूरी नसते त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची गरज नाही.
- मानवाला जातीमुळे नव्हे तर गुणामुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते.
- पुनर्जन्म, कर्मकांड, जपजाप्य इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक, आहेत. त्या गोष्टी कनिष्ठ वर्गाच्या पिळवणूकीचे कारण आहेत.
- कोणताही धर्मग्रंथ ईश्वरनिर्मित नाही. सर्व धर्मग्रंथांची निर्मिती मानवानेच केलेली आहे.
सत्यशोधक समाजाला समाजसुधारणेच्या चळवळीस अतिशय महत्त्व आहे. या समाजाने लोकांना स्वाभिमानी बनवण्याचे काम केले. वरिष्ठ वर्गाच्या वर्चस्वाविरुद्ध संघटित लढा दिला. ग्रामीण भागात या समाजाच्या शाखा सुरू झाल्या. साप्ताहिक सभेतून जनजागृती केली जात असे. लोकशिक्षणाचा उपयोग करून प्रचार केला जात असे. सत्यशोधकी जलसे, कीर्तन, प्रवचने, पोवाडे अशा माध्यमातून सामाजिक अनिष्ट चालीवर जहरी टीका केली. त्यामुळे समाज परिवर्तन झपाट्याने होऊ लागले. इ. स. १९९१ नंतर राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन केले. त्याच्याच प्रेरणेने व प्रोत्साहनाने महाराष्ट्रात पुढे सत्यशोधक समाजाचा मोठा प्रसार झाला. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालवले. या समाजाच्या कार्यामुळे निरपेक्ष कार्यकर्त्यांची नवी पिढी महाराष्ट्रात उदयास आली. यात छत्रपती शाहूमहाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात फार मोठी कामगिरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितोद्धाराची प्रेरणा महात्मा फुल्यांच्या कार्यातूनच घेतली होती. विसाव्या शतकातही या समाजाचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
महात्मा फुले हे मानवजातीचे सेवक होते. विषमता, अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. विद्येची महती समाजाच्या उन्नतीसाठी एक मार्ग आहे हे ओळखून त्यांनी स्त्रीशिक्षणावर भर दिला. अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. सत्यशोधक समाजाच्या रूपाने त्यांनी समाजापुढे मानवतावादी धर्म निर्माण केला.
सामाजिक परिषद
भारतीय समाजातील सामाजिक प्रश्नांची चर्चा करून धर्म सुधारणेला अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणारी एकोणिसाव्या शतकातील 'सामाजिक परिषद' ही एक संघटना होय. न्या. रानडे यांनी या संघटनेच्या स्थापनेसाठी फार परिश्रम घेतले. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात राजकीय प्रश्नांबरोबरच सामाजिक प्रश्नांवर चर्चा व्हावी, असे न्या. रानडे व इतर नेत्यांना वाटत होते, मात्र काँग्रेसमधील जेष्ठ नेत्यांना ते मान्य नव्हते. सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी एक स्वतंत्र संघटना असावी असा एक मतप्रवाह त्यातून निर्माण झाला. याच अनुषंगाने १८८७ साली राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनानंतर सामाजिक परिषद भरवण्यात आली. देशातील लोकांचे लक्ष सामाजिक प्रश्नांकडे वेधून घेणे आणि समाजसुधारणेच्या कार्याला गती देणे हा मुख्य हेतू होता. बालविवाह, विधवा स्त्रियांची स्थिती, केशवपन, अस्पृश्यता इ. अनिष्ट चालीरीतींवर चर्चा करून उपाय सुचवण्यावर या परिषदेत भर दिला जात होता. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांबाबत लोकजागृती होणे गरजेचे होते, असा या परिषदेचा दृष्टिकोन होता. सामाजिक परिषद ही स्वतंत्र कार्य करणारी संघटना होती, मात्र काँग्रेसमधील सनातनी लोकांचा तिला विरोध होता. त्यामुळे या परिषदेला काँग्रेस अंतर्गत संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले. न्या. रानडे यांनी हा वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून या परिषदेची अधिवेशने काँग्रेसच्या मंडपात होणार नाहीत असे जाहीर केले, मात्र या परिषदेने समाजसुधारणेसाठी जनजागृतीचे कार्य चालूच ठेवले. आपल्या समाजसुधारणेच्या चळवळीला हातभार लावला.
Tag:-
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog