जल प्रदूषण - निबंध Practical
जल प्रदूषण 'गंगा आली रे अंगणी लक्ष्मी आली रे अंगणी' गीताच्या या ओळीतून गंगेला म्हणजेच पाण्याला लक्ष्मीची उपमा दिली आहे. पाणी म्हणजे अमृत. पाणी म्हणजे जीवन. पाण्यावाचून कोणताच जीव जगू शकणार नाही कारण पाणी ही मूलभूत गरज आहे. पंचमहाभूतांच्या पायावर साऱ्या सृष्टीची उभारणी झाली आहे. या पंचमहाभूतांपैकी एक म्हणजे जलतत्त्व होय. पाण्यामुळे निसर्ग हिरवागार राहतो, समृद्धी नांदते, सजीव सृष्टीला नवजीवन लाभते. ग्रामीण भागात नद्या, तळी, आड, विहीर येथून पाणी उपलब्ध होते, तर शहरात नळाद्वारा घरोघरी पाणी मिळू शकते. पाणी ही जीवनावश्यक बाब; पण पाण्याचा वापर, नेमका कसा करावा हेच मानव लक्षात घेत नाही. यातून जल प्रदूषण होते. जल प्रदूषणाची काही कारणे दिलेल्या चित्रातून स्पष्टपणे जाणवतात. अथांग, निळाशार जलाशय मनाला मोहवितो; पण वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण यामुळे पाण्याचे निर्मळ रूप बदलून जाते. जशी शहरे वाढली तशा उंच इमारती वाढल्या, पिण्याच्या पाण्याचे नळ घरोघरी गेले. सांडपाण्याचे एकत्रीकरण होऊन हे पाणी नदीच्या प्रवाहात सोडले गेले. औदयोगिकीकरणामुळे कारखाने वाढत आहेत. अनेक कारखान्यांतून रसायनयुक्त, जीव...