संशोधन संकल्पना व स्वरूप आणि त्याच्या व्याख्या
मराठी भाषेत संशोधनाची संकल्पना नवीन नाही. मराठी वाङ्मयाच्या अगदी प्रथमावस्थेमध्येच संशोधन संकल्पनेची मुळे दिसून येतात. 'लीळाचरित्रा'ची रचनाच संशोधनातून झाली आहे, असे म्हणता येईल. प्रत्येक लीळा खरी आहे की खोटी आहे, हे पडताळून पाहिले गेले. ही पाहण्याची प्रक्रिया संशोधनाचीच होती. अशा संशोधन संकल्पनेचा अर्थ, संशोधन संकल्पनेची व्याप्ती, संशोधनाची व्याख्या आणि संशोधनशास्त्राची परिसंकल्पना या घटकामध्ये आपल्याला समजून घ्यायची आहे. कोणत्याही उपयुक्त शास्त्राची किंवा विचाराच्या अभ्यासाची सुरूवात त्या शास्त्राची संकल्पना समजावून घेण्यापासून होते. संशोधन हे शुध्द वैचारिक शास्त्र आहे. म्हणून संशोधनाची संकल्पना समजून घेण्यापासून संशोधन शास्त्राचे स्वरूप, त्या शास्त्राची मांडणी पाहणे शास्त्रशुध्द अभ्यासाच्यादृष्टीने आवश्यक असते, ते येथे पाहु . संशोधन संकल्पना संशोधन म्हणजे काय आणि संशोधनाचा अर्थ व कार्य पाहण्यापूर्वी आपण संशोधन या शब्दाचा अर्थ आणि संशोधन ही संज्ञा-संकल्पना प्रथम समजून घेऊ. संशोधन या शब्दाची व्युत्पत्ती से + शोधन संशोधन अशी आहे. संशोधन म्हणजे शोध घेणे, काळजीपूर्वक तपासणे, सत्...