साहित्याची समीक्षा माहिती साहित्याचे संशोधन
साहित्याची समीक्षा
साहित्याची समीक्षा म्हणजे साहित्याचे संशोधन नव्हे. साहित्याची समीक्षा ज्या साहित्यशास्त्रीय विचारानुसार होते, ते
साहित्यविचार म्हणजे सुध्दा साहित्याचे संशोधन नव्हे. परंतु समीक्षा आणि साहित्यविचार ह्या दोन्ही गोष्टी साहित्यसंशोधनासाठी आवश्यक असतात. साहित्याचे समीक्षाशास्त्र व साहित्यशास्त्र या दोन्हींमधील बारकावे, त्यातील संज्ञा व संकल्पना माहीत नसतील, अवगत नसतील तर साहित्याच्या संशोधनात अडथळे येऊ शकतात. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी पाहून घ्याव्या लागतात. मग संशोधन अवघड होते. समीक्षा, वाड्मयेतिहास आणि संशोधन ह्या परस्परांना पूरक ठरतात आणि परस्परांचलंबीही ठरतात. सम+इक्ष समीक्षा, अशा प्रकारे समीक्षा या शब्दाची व्युत्पत्ती किंवा फोड सांगता येते. साहित्याकडे सर्व बाजूंनी पाहणे, (इक्षण पाहणे) असे असले तरी समीक्षा व्यक्तिसापेक्ष असते. कारण आस्वादनाला समीक्षेत महत्त्वाचे स्थान असते. आस्वादन तथ्यांनुसार होत असते, आस्वाद साहित्याच्या आकलनाला मदत करीत असते. त्यामुळे आकलन बेगवेगळ्या दृष्टींनी घडते. उदारहणार्थ, समाजशास्त्रीय समीक्षादृष्टी, मानसशास्त्रीय समीक्षादृष्टी, स्त्रीवादी समीक्षादृष्टी अशा वेगवेगळ्या दृष्टींनी समीक्षा होते आस्वादनात अभिरुची अभिप्रेत असते. अभिरुची व्यक्तिगणिक भिन्न भिन्न असते.
अभिरुची म्हणजे आवडनिवड. अभिरुची व्यक्तिसापेक्ष असते. सापेक्षतेमध्ये अनेक गोष्टी सोडल्या जात असतात आणि अनेक गोष्टी गृहित धरल्या जात असतात. त्यामुळे समीक्षा ही पुनर्निर्मितीच्या अनुषंगाने पुढे सरकते. ती आस्वाद्य होते. समीक्षेत खंडनमंडनाची आवश्यकता नसते. आकलन, आस्वादन या गोष्टी लेखकाच्या निर्मिती इतक्या सुघड होऊ शकतात. "समीक्षा व्यवहारात बौध्दिक उत्सुकतेपोटी प्रश्न पडत नसून कलाकृतीतील विविध घटितांचे पोत व कुळसाम्य आणि कुळवैधर्म्स आत्मनिष्ठ पध्दतीने न्याहाळण्याचा प्रयत्न ठरतो." (उषा मा. देशमुख १९९४ : ११२)
समीक्षेत आणि संशोधनात नवनिर्माण, सृजनात्मक आणि अमूर्ताचा शोध घेण्याचा प्रयत्न या गोष्टी समांतर असतात, समीक्षेमध्ये कलाकृतीचा आस्वाद, विश्लेषण, चिकित्सा, मूल्यमापन अर्थनिर्णय हे आत्मनिष्ठपणे होते. संशोधनात या प्रक्रियेसह पुरावे देत वस्तुनिष्ठपणे मूल्यनिर्णय द्यावे लागते. संशोधनात ज्ञानगर्भ आणि मूलगर्भ सिध्दांत अपेक्षित असतात.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog