जल प्रदूषण - निबंध Practical
जल प्रदूषण
'गंगा आली रे अंगणी
लक्ष्मी आली रे अंगणी'
गीताच्या या ओळीतून गंगेला म्हणजेच पाण्याला लक्ष्मीची उपमा दिली आहे. पाणी म्हणजे अमृत. पाणी म्हणजे जीवन. पाण्यावाचून कोणताच जीव जगू शकणार नाही कारण पाणी ही मूलभूत गरज आहे.
पंचमहाभूतांच्या पायावर साऱ्या सृष्टीची उभारणी झाली आहे. या पंचमहाभूतांपैकी एक म्हणजे जलतत्त्व होय. पाण्यामुळे निसर्ग हिरवागार राहतो, समृद्धी नांदते, सजीव सृष्टीला नवजीवन लाभते. ग्रामीण भागात नद्या, तळी, आड, विहीर येथून पाणी उपलब्ध होते, तर शहरात नळाद्वारा घरोघरी पाणी मिळू शकते. पाणी ही जीवनावश्यक बाब; पण पाण्याचा वापर, नेमका कसा करावा हेच मानव लक्षात घेत नाही. यातून जल प्रदूषण होते. जल प्रदूषणाची काही कारणे दिलेल्या चित्रातून स्पष्टपणे जाणवतात.
अथांग, निळाशार जलाशय मनाला मोहवितो; पण वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण यामुळे पाण्याचे निर्मळ रूप बदलून जाते. जशी शहरे वाढली तशा उंच इमारती वाढल्या, पिण्याच्या पाण्याचे नळ घरोघरी गेले. सांडपाण्याचे एकत्रीकरण होऊन हे पाणी नदीच्या प्रवाहात सोडले गेले. औदयोगिकीकरणामुळे कारखाने वाढत आहेत. अनेक कारखान्यांतून रसायनयुक्त, जीवसृष्टीस घातक असे पाणी नदीमधे सोडले जाते. हे जल प्रदूषण आहे. वरील चित्र या दृष्टीने बोलके आहे.
पाण्यामुळे भूमी हरित होते. सुंदर होते. त्याचप्रमाणे जीवसृष्टी निर्मळ आणि स्वच्छ राहू शकते. मानव हा स्वच्छतेचा भोक्ता आहे. पण या स्वच्छतेच्या नादात तो नदीचे पाणी मात्र अस्वच्छ करतो. प्रदूषित करतो ही बाब चित्रातून लक्षात येते. नदीत कपडे धुणे, भांडी घासणे, जनावरे पुणे, अंघोळ करणे इ.मुळे नदीचे पाणी दूषित होते. शेत पाणवनस्पतींची अतिरिक्त वाढही पाणी खराब करते. पाण्यात टाकले जाणारे निर्माल्य, कचरा यासर्वांमुळे पाण्याचे रूप पालटते.
पाण्यात अनैसर्गिक, दूषित घटक मिसळण्याचे काम माणूस करतो. पाण्याचे स्वच्छ, निर्मळ आणि जीवनोपयोगी रूप
बदलून त्या पाण्याला गंगेऐवजी 'गटारगंगा' बनविण्यास माणूस कारणीभूत होतो. या दृष्टीने वरील चित्रातील आशयाला
महत्त्व आहे.
महात्मा गांधी म्हणतात, 'वर्तमानात आपण काम करतो त्यावर देशाचे भविष्य अवलंबून असते.' मानवाकडून होणाऱ्या जल प्रदूषणाचे परिणाम सर्व सजीव सृष्टीला भोगावे लागतात. दूषित पाण्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळते व जनजीवन धोक्यात येते. जलचरांच्या जीविताला धोका पोहोचतो.
पाणी म्हणजे अखिल जीवसृष्टीचे जीवन आहे म्हणून पाणी स्वच्छ व शुद्ध ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जल
प्रदूषणाचे उद्बोधक चित्र पाहिल्यानंतर ते टाळण्यासाठी प्रत्येकाने कृतिशील व्हायला हवे.
तरच म्हणता येईल,
पाणी हेच जीवन!
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog